पेट्रोल डिझेल दरवाढीचा पुन्हा झटका; पाहा आजचे दर
काम-धंदा

पेट्रोल डिझेल दरवाढीचा पुन्हा झटका; पाहा आजचे दर

नवी दिल्ली : लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे आर्थिक संकट देखील ओढवलेलं असताना सामान्यांसाठी पेट्रोल-डिझेल दरवाढ हे देखील कोरोना साथीप्रमाणेच पसरलेलं संकट ठरलं आहे. देशात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या आधी आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शनिवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ न होता ते स्थिर राहिल्यामुळे दर कमी होण्याची काहीशी आशा निर्माण झालेली असतानाच रविवारी पुन्हा दरवाढ झाली. देशाची राजधानी दिल्लीमध्ये रविवारी पेट्रोल प्रतिलिटर ९७ रुपये २२ पैसे तर डिझेल प्रतिलिटर ८७ रुपये ९७ पैसे दराने विकलं जात आहे. दुसरीकडे आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलसाठी मुंबईकरांना प्रतिलिटर १०३ रुपये ३६ पैसे तर डिझेलसाठी ९५ रुपये ४४ पैसे मोजावे लागत आहेत. भोपाळमध्ये हेच दर अनुक्रमे १०५ रुपये ४३ पैसे आणि ९६ रुपये ६५ पैसे इतके आहेत. तर दुसरीकडे पाटण्यामध्ये अनुक्रमे ९९ रुपये २८ पैसे आणि ९३ रुपये ३० पैसे दर झाले आहेत.

राज्यांच्या राजधान्यांमध्ये सर्वात आधी भोपाळमध्ये पेट्रोल दरांनी शंभरी पार केली. त्यापाठोपाठ जयपूर आणि मुंबईनं देखील आपला नंबर लावला. आता या यादीमध्ये हैद्राबाद आणि बंगळुरूचा देखील समावेश झाला आहे. राज्यांचा विचार करता गेल्या दीड ते दोन महिन्यांत झालेल्या पेट्रोल दरवाढीमुळे देशातील ८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलचे भाव शंभरीच्या वर गेले आहेत. यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, जम्मू-काश्मीर आणि लडाख यांचा समावेश आहे. एका आकडेवारीनुसार भारत-पाकिस्तान सीमेवरील राजस्थानमधील श्री गंगानगर जिल्हा पेट्रोलचे दर शंभरीपार नेणारा देशातला पहिला जिल्हा ठरला आहे. गेल्या महिन्यात तर तिथे डिझेल देखील प्रतिलिटर १०० रुपयांच्या वर जाऊन पोहोचलं होतं.