अर्णब गोस्वामीला आणखी एक मोठा झटका; अर्णबसह तिघांना न्यायालयाचे समन्स
बातमी महाराष्ट्र

अर्णब गोस्वामीला आणखी एक मोठा झटका; अर्णबसह तिघांना न्यायालयाचे समन्स

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला न्यायालयाने आणखी एक झटका दिला आहे. वास्तुरचनाकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णबसह तीनही आरोपींना अलिबाग न्यायालयात हजर राहावं लागणार आहे. तिघांनाही येत्या ७ जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्यासाठी अलिबागच्या मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी समन्स बजावले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सर्वोच्च न्यायालयानं अर्णब गोस्वामीची जामिनावर सुटका केली. मात्र या गुन्ह्यात रायगड पोलिसांनी अर्णबसह फिरोज शेख आणि नितेश सारडा यांच्याविरुद्ध अलिबाग न्यायालयात १८०० पानी दोषारोप पत्र दाखल केलं आहे. त्यावर बुधवारी सुनावणी झाली. या संदर्भात आरोपीनी उच्च न्यायालयात दाद मागितली असल्याने पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्राची दखल घेऊ नये असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. यावर सरकार पक्षातर्फे बाजू मांडताना विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी न्यायालयाने याला कुठलीही स्थगिती दिली नसल्याने खटला सुरू रहावा, अशी विनंती केली. ती न्यायालयाने मान्य केली.

२०१८ मध्ये अन्वय नाईक यांनी अलिबाग जवळच्या कावीर येथील आपल्या घरी आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटवरून अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. रायगड पोलिसांनी २ वर्षांपूर्वीच्या या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडली. त्यानंतर अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सारडा या तिघांना अटक करण्यात आली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले होते. दरम्यान, यासंदर्भात रायगड पोलिसांनी सत्र न्यायालयात दाखल केलेल्या पुनर्विचार अर्जावर १९ डिसेंबरला सुनावणी होणार आहे.