धक्कादायक! पुण्यात सराईत गुंडाच्या अंत्यविधीला १२५ बाईक्सची रॅली
पुणे बातमी

धक्कादायक! पुण्यात सराईत गुंडाच्या अंत्यविधीला १२५ बाईक्सची रॅली

पुणे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. पुण्यातील स्थितीची दखल उच्च न्यायालायने घेतलेली असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील माधव वाघाटे या गुन्हेगाराची व्हॉट्सअॅप स्टेटसवरुन झालेल्या वादानंतर हत्या करण्यात आली. वाघाटेची हत्या झाल्यानंतर रविवारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अंत्ययात्रेदरम्यान दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीत १२५ दुचाकी सहभागी झाल्या होत्या.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

धनकवडी ते कात्रज स्मशानभूमीपर्यंत ही रॅली काढण्यात आली. या प्रकरणी १५० ते २०० जणांविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाउन जाहीर केले असून कठोर निर्बंध लावण्यात आलेले असतानाही रॅली काढण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यासोबतच कायदा सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र केंजली यांनी फिर्याद दिल्यानंतर १५० ते २०० जणांविरोधात सहकारनगर पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यात कोरोनामुळे मृतांची संख्या वाढत असताना पालकमंत्री अजित पवार दर आठवड्याला आढावा बैठक घेत आहेत. एकीकडे प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असताना दुसरीकडे एका सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीसाठी बाईक रॅली काढण्यात आल्याने सर्वत्र चर्चाही सुरु होती.