जो ओबीसी की बात करेगा वो ही देश पे राज करेगा; विजय वडेट्टीवारांचा नारा
बातमी मराठवाडा

जो ओबीसी की बात करेगा वो ही देश पे राज करेगा; विजय वडेट्टीवारांचा नारा

जालना : “हा मोर्चा कुणाच्याही विरोधात नाही. हा फक्त आमच्या हक्कासाठी आहे. ओबीसी नेत्यांच्या स्वतंत्र जनगणना करावी,” अशी मागणी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. “कुणाला काय द्यायचं ते द्या, पण आमच्या हक्काचं आम्ही सोडणार नाही,” असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले. ओबीसी समाजाची स्वतंत्रपणे जनगणना व्हावी, या मागणीसाठी रविवारी जालन्यात महामोर्चा काढण्यात आला. यावेळी जनतेला संबोधित करताना ते बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जालन्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी साडे अकरा वाजता भव्य मोर्चाला सुरूवात झाली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील ओबीसी समाजातील नागरिकांनी खूप मोठ्या संख्येने या मोर्चात सहभाग घेतला होता.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, “विधानसभेत स्वतंत्र जनगणनेचा मी प्रस्ताव मांडणार आहे. आमच्या स्वतंत्र जनगणनेचा मार्ग मोकळा करा, अशी माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे. पक्षाच्या पलीकडे लढाई जात नाही तोपर्यंत यश मिळणार नाही. बाळासाहेब सराटे नावाचा व्यक्ती आमचे हक्क हिरावण्याचा प्रयत्न करत आहे,” असा आरोपही विजय वडेट्टीवारांनी केला.

ते पुढे म्हणाले की, ”आम्ही वकील दिला. जर तो दिला नसता तर ओबीसीचं आरक्षण रद्द झालं असतं. बारा बलुतेदारांचे स्वतंत्र महामंडळ स्थापन केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तुम्ही म्हणाल ती लढाई लढायला मी सज्ज आहे. पाठ नेहमी मजबूत असावी कारण शाबासकी आणि धोका हा नेहमी पाठीमागून होतो. जो ओबीसी की बात करेगा वो ही देश पे राज करेगा,” असेही वडेट्टीवारांनी म्हटले.

तसेच, “गायकवाड समिती ही मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाची समिती होती. मात्र या समितीवर मागासवर्गीयच नव्हते हाच खरा मुद्दा आहे. तरी देखील एसीबीसी तून मराठा समाजाला आरक्षण घेण्यासाठी कुणाचाही विरोध नाही. परंतु काही विघ्नसंतोषी त्याला वेगळे वळण देण्यासाठी काम करत आहेत असेही ते म्हणाले.