…म्हणून तन्मय फडणवीसला दिला लसीचा दुसरा डोस; रुग्णालयानं दिलं स्पष्टीकरण
बातमी विदर्भ

…म्हणून तन्मय फडणवीसला दिला लसीचा दुसरा डोस; रुग्णालयानं दिलं स्पष्टीकरण

नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीसला पात्र नसतानाही लसीचा दुसरा डोस मिळाल्याने सध्या वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर या चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे लसींचा तुटवडा निर्माण झाला असताना सर्वसामान्यांना सुविधा मिळत नसताना तन्मय फडणवीसला लस कशी मिळाली असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान तन्मय फडणवीसला लसीचा डोस देणाऱ्या नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटने यासंबंधी स्पष्टीकरण दिलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालक शैलेश जोगळेकर यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं आहे की, तन्मय फडणवीसने आमच्याकडे लसीचा दुसरा डोस घेतला. मुंबईमधील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्याने पहिला डोस घेतला होता. त्याला कोणत्या निकषाद्वारे पहिला डोस देण्यात आला याची कल्पना नाही. त्याने आम्हाला प्रमाणपत्र दाखवल्यानंतर आम्ही आमच्या सेंटरमध्ये दुसरा डोस दिला.

तन्मय फडणवीसच्या फोटोवरुन झालेल्या वादावर स्पष्टीकरण देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही. जर हे नियमानुसार झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण जर नियमावलीचं उल्लंघन झालं तर हे अगदी अयोग्य आहे. पात्र नसल्याने माझ्या पत्नी आणि मुलीलाही लस मिळालेली नाही. प्रत्येकाने नियमांचं पालन केलं पाहिजे हे माझं ठाम मत आहे.