लसीकरण मोहिमेत भारताने अमेरिका, युके आणि फ्रान्सलाही टाकले मागे
देश बातमी

लसीकरण मोहिमेत भारताने अमेरिका, युके आणि फ्रान्सलाही टाकले मागे

मुंबई : भारतात कालपासून जगभरातील सर्वात मोठ्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरवात झाली. पहिल्याच दिवशी देशभरातील २,०७,२२९ कोविड योद्ध्यांना लस देण्यात आली. दिवसभरात सर्वाधिक लोकांना लस दिल्याचा हा जागतिक विक्रम ठरला आहे. अमेरिका, युके आणि फ्रान्स या आघाडीच्या देशांनाही भारतानं यामध्ये मागे टाकलं आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोहर अग्नानी यांनी लसीकरणाची माहिती देताना सांगितलं की, देशात लसीकरणाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी केवळ सहा राज्यांनीच लसीकरण सेशन केले. आज झालेल्या एकूण ५५३ सेशनमध्ये १७,०७२ कोविड योद्ध्यांना लस देण्यात आली. त्यामुळे काल आणि आज अशा दोन दिवसांत एकूण २,२४,३०१ लोकांना भारतात लस देण्यात आली आहे. या दोन्ही दिवसांमध्ये लसीकरणानंतर ४४७ जणांमध्ये प्रतिकूल परिणाम दिसून आले यांपैकी केवळ तीन जणांनाच रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासली.

मंत्रालयाने म्हटले आहे की, आम्ही प्रत्येक परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. प्रोटोकॉल तयार केले गेले आहेत. काल आणि आजपर्यंत 447 एईएफआय अहवाल आहेत. यापैकी फक्त तीन जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले, त्यापैकी दोघांना उत्तर रेल्वे रुग्णालय आणि एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर अजून एकजण एम्स ऋषिकेशमध्ये उपचार घेत आहे. लसीकरणानंतर ज्यांना त्रास झाला त्यामध्ये ताप, डोकेदुखी, उलट्या यासारख्या किरकोळ आरोग्याशी संबंधित समस्या समोर आल्या आहेत.