जीवाची पर्वा न करता युध्द जिंकण्यासाठी तयार रहा; शी जिनपिंग यांचे चीनी सैन्याला आवाहन
बातमी विदेश

जीवाची पर्वा न करता युध्द जिंकण्यासाठी तयार रहा; शी जिनपिंग यांचे चीनी सैन्याला आवाहन

बीजिंग : भारत आणि अमेरिकेशी सुरु असलेल्या तणावाच्या पार्शभूमीवर चीनच्या राष्ट्रपतींनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. ”आपल्या जीवाची पर्वा न करता युध्द जिंकण्यासाठी तयार रहा, असं आवाहन चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी चीनी सैनिकांना केलं आहे. चीनचा त्याच्या शेजारील देशांसोबत सीमाप्रश्नावरुन वाद आहे. गेल्या सहा महिन्यांपासून लडाख सीमेवरही चीनने आगळीक केल्याने भारतानेही त्या भागात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) च्या अधिकाऱ्यांना संबोधित करताना शी जिनपिंग म्हणाले की, “सैनिकांनी संकाटाची चिंता करु नये. आपल्याला युध्दाला सामोरं जावं लागणार आहे. या दृष्टीकोनातून लष्कराने ट्रेनिंग आणि तयारी करावी. पीपल्स लिबरेशन आर्मीचा विस्तार करणं हेच चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे ध्येय आहे.” दरम्यान, तैवानच्या मुद्द्यावरुनही जगभरातील देशांनी चीनच्या भूमिकेवर टीका केली आहे. तर, अमेरिकेसोबतही वेगवेगळ्या स्तरावर चीनचा तणाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर चीनच्या राष्ट्रपतींनी लष्कराला केलेल्या युध्दासाठी तयारी राहण्याच्या आवाहनामुळे जगभरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

चीनच्या शिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या एका बातमीनुसार, सेट्रल मिलिटरी कमिशनच्या अंतर्गत 20 लाख संख्येच्या चीनी लष्कराचा समावेश होतो. चीनच्या सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्षपदही शी जिनपिंग यांच्याकडेच आहे. तसेच, आधुनिक काळासाठी लष्कराच्या बळकटीकरणासोबतच लष्कराच्या रणनीतीवर कम्युनिस्ट पक्षाच्या विचारसरणी लागू करण्यावर शी जिनपिंग यांनी जोर दिला आहे.

त्याचबरोबर, शी जिनपिंग यांनी लष्कराला युध्दास तयार राहण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर आपल्या बुध्दीचा वापर युध्द जिंकण्यासाठी करावा, असेही त्यांनी काही दिवसांपूर्वी चीनच्या नौसेनेला सांगितलं होतं. तथापि, चीन प्रोपगंडामध्ये पसरविण्यात निपुण असलेला चीन भारत, तैवान आणि अमेरिकेला वेगवेगळ्या पध्दतीनं आव्हान देत आहे. अशातच आता जिनपिंग यांनी केलेल्या या आव्हानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. चीनच्या या आव्हानाला भारत आणि अमेरिका कसे उत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.