शेतकरी आंदोलनातील शहीद शेतकऱ्यांसाठी श्रद्धांजली सभा; तर संघटनांचे मोदींना खुले पत्र
देश बातमी

शेतकरी आंदोलनातील शहीद शेतकऱ्यांसाठी श्रद्धांजली सभा; तर संघटनांचे मोदींना खुले पत्र

नवी दिल्ली : दिल्लीत आज शेतकरी आंदोलनाचहा २५ व दिवस असून नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी अजूनही ठाम आहेत. दरम्यान आज शेतकरी संघटनांनी आतापर्यंत आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना शहीदांचा दर्जा दिला आहे. तसेच शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या या सर्व शेतकऱ्यांसाठी श्रद्धांजली सभा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी बोलताना शेतकरी आंदोलनावरुन विरोधकांवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, विरोधक नव्या कृषी कायद्यांवरुन शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. या आरोपाला उत्तर देत शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. मोदींना खुलं पत्र लिहिणारी समिती ही त्या 40 शेतकरी संघटनांपैकी एक आहे, जी गेल्या 23 दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत.

नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं दिल्लीच्या वेशीवर कडाक्याच्या थंडीतही आपल्या मागण्यांवर ठाम असणाऱ्या शेतकऱ्यांचा सरकारविरोधातील लढा सुरुच आहे. दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या काळात अखिल भारतीय किसान समन्वय समितीने शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना पत्र लिहिलं आहे.

या पत्रात शेतकऱ्यांनी म्हटलं आहे की, सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. मोदी आणि तोमर यांना हिंदीतून लिहिण्यात आलेल्या वेगवेगळ्या पत्रांमध्ये समितीने म्हटलं आहे की, सरकारचा हा गैरसमज आहे की, तिनही कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोधी पक्षांकडून सुरु ठेवण्यात येत आहे.

तसेच,  “सत्य हेच आहे की, शेतकऱ्यांच्या आंदोलनाने राजकीय पक्षांना आपले विचार बदलण्यास भाग पाडलं आहे. अशातच तुम्ही जे आरोप करत आहात, ते अत्यंत चुकीचे आहेत.” तसेच पुढे बोलताना समितीने पत्रात म्हटलं आहे की, “विरोध करणारी कोणतीही शेतकरी संघटना ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही.”असेही शेतकऱ्यांनी पत्रात म्हंटले आहे.