अखेर ‘या’ जिल्ह्यात लॉकडाऊन लागलाच
विदर्भ

अखेर ‘या’ जिल्ह्यात लॉकडाऊन लागलाच

यवतमाळ : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे यवतमाळ जिल्हा येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी घेतला आहे. गेल्या दहा दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. तर कोरोनामुळे डिसेंबर महिन्यात 29 , जानेवारी महिन्यात 25 मृत्यू झाले होते. तर फेब्रुवारी महिन्यात मृत्यू दरात मोठी वाढ झाली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढती संख्या आणि मृत्यूचे प्रमाण पाहता अखेर यवतमाळमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एम देवेंदर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ, पांढरकवडा आणि पुसद या तीन ठिकाणी सर्वाधिक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. रुग्णसंख्या वाढणाऱ्या तीन ठिकाणाहून प्रतिदिन प्रत्येकी 500 याप्रमाणे दिवसाला 1500 नमुन्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने मृत्यू होण्याची कारणे, याबाबत विश्लेषण करून डेथ ऑडीट रिपोर्ट अधिष्ठाता यांना सदर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्याचबरोबर खाजगी रुग्णालय येथे कोरोनामुळे मृत्यू होण्याची कारणे याबाबत ऑडीट रिपोर्ट जिल्हा शल्य चिकित्सकांनी सादर करावे, असे निर्देश दिले आहेत. हाय -रिस्क, लो-रिस्कनुसार लॉकडाऊन राहणार आहे. तसेच, कोरोनाच्या रुग्णाचा आलेख वाढण्याचे कारणे म्हणजे सोशल डिस्टनसिंग न पाळणे, लग्न समारंभ मध्ये झालेली गर्दी, मास्क न वापरणे आणि कोरोना नियम पायदळी तुडवल्याने हे सतत वाढत राहिला. त्यामुळे आम्ही 28 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. असेही जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी सांगितले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सकाळी मुंबई झालेल्या पत्रकारपरिषदेत यवतमाळसह आणखी दोन जिल्ह्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी लागेल, असा इशारा दिला होता. शिवसेना आमदार संजय राठोड यांच्या परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. संजय राठोड, यशोमती ताई, बच्चू कडू यांच्याशी मी बोललो आहे. कोरोनाची परिस्थिती आणखी गंभीर झाली तर तिथे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे मी त्यांच्या कानावर घातले आहे, असे अजित पवार यांनी सांगितले होते.