धनंजय मुंडे प्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले….
राजकारण

धनंजय मुंडे प्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले….

पुणे : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने त्यांच्यावरील तक्रार मागे घेतली. त्यामुळे धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासंदर्भात पुण्यात बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलने आपली तक्रार मागे घेतली याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, “याप्रकरणात धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी पक्षाची मोठी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. महिलेने तक्रार मागे घेतली हे मला कळाले. बातमी आल्यानंतर सगळ्या मीडियाने लावून धरली होती. अशा आरोपामुळे त्या लोकांची बदनामी होते. विरोधक या विषयाचा मुद्दा करतात. बहुजन समाजातून आलेल्या नेत्यांना त्रास झाला. धनंजय मुंडे यांना भयंकर त्रास झाला. पक्षाला सुद्धा याचा त्रास झाला. यापूर्वी राष्ट्रवादी युवकांची सुद्धा बदनामी केली. असे आरोप करणारे काही तथ्य समोर आले नाही”

तसेच, अशा प्रकरणात घाई होते. या प्रकरणी सर्वांनी विचारा करावा. आज माझे धनंजयसोबत बोलणं झाले नाही. कोणावरही राजकीय सूडबुद्धीने कारवाई करु नये, असं अजित पवारांनी नमूद केलं. तसेच, एखादा व्यक्ती राजकारणात, समाजकारणात काम करु लागला, तर त्याचं नाव लोकांत चांगलं होण्यासाठी कष्ट घ्यावं लागतं. असे आरोप झाल्यावर एका झटक्यात माणूस बदनाम होतो, विरोधक बोट ठेवतात. महिला संघटना आंदोलनं करतात, राजीनामा मागितला जातो. ज्यांनी ज्यांनी ही मागणी केली, धनंजयसंबंधात वक्तव्य केली, माहिती न घेता मागणी केली, त्याला जबाबदार कोण? असा सवाल अजित पवार यांनी केला.

यावेळी बोलताना त्यांना तुम्ही कोरोनाची लस कधी घेणार याबाबत विचारले असता ते म्हणाले की, “लसीकरणाबाबत काही अडचणी आहेत. ग्रामीण भागात लसीकरणाचं प्रमाण अधिक आहे. ६० ते ६५ टक्के लसीकरण झाले आहे. मात्र शहरांत २५ ते ३० टक्केच लोकांनी लस घेतली. लोक ऐनवेळी निर्णय बदलत आहेत. तसेच कोविन ॲपदेखील समस्या आहे. या साऱ्या गोष्टींवर आमचे काम सुरू आहे. त्यामुळे आम्हाला जेव्हा करोनालस घेण्याची परवानगी मिळेल, तेव्हा आम्ही लस घेऊ आणि तुम्हालाही सांगू”, असं अजित पवार म्हणाले.

त्याचबरोबर, या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. “आरोपांच्या मूळाशी जाण्याची गरज आहे, असं मी आधीच म्हटलं होतं. सत्य समजल्याशिवाय निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात अर्थ नाही. आम्ही योग्य होतो, हे सिद्ध झालय” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.