अनिल देशमुखांची मोठी घोषणा; सचिन वझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करणार
राजकारण

अनिल देशमुखांची मोठी घोषणा; सचिन वझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करणार

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी पोलीस आधिकारी सचिन वझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करण्यात येणार, असल्याची गृहंमत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत घोषणा केली आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर निवेदन देण्यासाठी अनिल देशमुख विधानपरिषदेत उपस्थित होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी त्यांनी सचिन वझे यांची क्राइम ब्रांचमधून बदली करुन इतर ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती दिली. मात्र भाजपाने कालपासूनच सचिन वझे यांच्या अटकेची मागणी मागणी लावून धरली आहे. आजदेखील विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली. सचिन वाझें यांच्या मुद्द्यावरुन विधानपरिषदेत जोरदार घोषणाबाजी देखील पाहायला मिळाली.

यावेळी बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, ” “सचिन वाझेंवर नियमानुसार कारवाई होईल. सध्या क्राइम ब्रांच जिथे ते कामाला आहेत तिथून हलवून दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येईल. निष्पक्षपणे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. मात्र अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंची बदली होणार असल्याची घोषणा केल्यानंतरही विरोधकांचा गदारोळ कायम होता. बदली नाही तर निलंबन करुन अटक करा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.

भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी सचिन वझे यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली होती. सचिन वझे यांची बदली झाली यावर आम्ही समाधानी नाही. सचिन वझे यांची बदली नाही तर त्यांचं निलंबन केलं पाहिजे, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली आहे. जोपर्यंत सचिन वाझेंचं निलंबन होत नाही तोवर अधिवेशन चालू देणार नाही, असं दरेकर यांनी म्हटलं. त्याचबरोबर, ठाकरे सरकार गुन्हेगारांना पाठिशी घालणारं सरकार आहे. या सरकारची प्रतीमा मलीन झाली आहे. सचिन वझेंना तात्काळ अटक झाली आहे. त्यांचं निलंबन करुन त्यांची चौकशी झाली पाहिजे. सचिन वझेंवर कारवाई करण्याची सरकारची मानसिकता नाही. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे, असा आरोप प्रविण दरेकर यांनी केला आहे.

दरम्यान, सचिन वझे प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. आज संध्याकाळी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकरणात विरोधकांनी सरकारची कोंडी केली आणि सत्ताधारी सभागृहात हा विषय हाताळू शकले नाही याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे.