भाजप नेत्यावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; प्रदेशाध्यक्षांनाही नोटीस
राजकारण

भाजप नेत्यावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; प्रदेशाध्यक्षांनाही नोटीस

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरु आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने २४ तासांसाठी प्रचारबंदी लागू केल्यानंतर आता भाजप नेत्यावरही कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने भाजपनेते राहुल सिन्हा यांच्यावर कारवाई केली असून ४८ तासांसाठी प्रचारबंदी घालण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भाजप नेते राहुल सिन्हा यांनी बिहारमधील सीतलकूची येथे चार नाही तर आठ लोकांना ठार करायला हवं होतं असं वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी त्यांच्यावर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. याशिवाय निवडणूक आयोगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांना नोटीस पाठवली आहे. निवडणूक आयोगाने घातलेली प्रचारबंदी मंगळवारी संध्याकाळी सुरु होत असून १५ एप्रिलला दुपारी १२ वाजेपर्यंत कायम असेल. सीतलकूची येथील हिंसाचारात पाच लोकांनी आपला जीव गमावला होता. यामध्ये चार जणांना केंद्रीय दलाकडून गोळ्या घालण्यात आल्या होत्या. राहुल सिन्हा यांनी यावर बोलताना चार नाही तर आठ जणांना गोळ्या घालायला हव्या होत्या असं म्हटलं होतं.

दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनाही निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली असून बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न झाला तर अशा घटना होत राहतील असं दिलीप घोष यांनी म्हटलं होतं.