कॉंग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरूच; नाना पटोले विरुध्द नितीन राऊत नवे वाद
राजकारण

कॉंग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरूच; नाना पटोले विरुध्द नितीन राऊत नवे वाद

मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे कॉंग्रेस पक्षात सुरु असलेले नाराजी नाट्य. महाविकास आघाडीसरकार स्थापन होऊन दीड वर्ष होत आले, मात्र अद्यापही काँग्रेसचे नाराजीनाट्य सुरूच असल्याचे दिसत आहे. काँग्रेस कधी आपल्या मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर नाराज असते तर कधी काँग्रेसमधील नेतेच एकमेकांवर नाराज असतात.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नाना पटोले हे काही दिवसांपूर्वी हे विधानसभा अध्यक्ष होते. नंतर त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र आता नाना पटोले यांना मंत्रीपदाची अपेक्षा देखील आहे असं सांगितलं जातंय. त्यातही ऊर्जा विभागाकडे त्यांचं लक्ष असल्याची चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात आहे. त्यामुळे सध्या नाना पटोले आणि राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत एकमेकांच्या विरुद्ध असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

‘ऊर्जा’ विभागाबाबत नाना पटोले यांनी पण अप्रत्यक्षपणे सूतोवाच केले होते. पण त्यामुळे आता नितीन राऊत नाराज असल्याची माहिती मिळत आहे. नितीन राऊत यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठीकडे काँग्रेसमधीलच काही नेत्यांनी तक्रार केल्याची चर्चा होती.

विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यानंतर आता नवे विधानसभा अध्यक्ष कोण होणार यावर राजकीय विश्वात चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना ऊर्जा मंत्रीपद देण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

पक्षश्रेष्ठींनी संघटनेचे काम माझ्यावर सोपविले आहे आणि ते मी पूर्ण प्रामाणिकपणा आणि मेहनतीने करीत आहो. सध्या राज्यात जी स्थिती आहे, ती पाहता सध्या माझीच मंत्रिमंडळात जाण्याची इच्छा नाही. सध्या संघटन मजबूत करायचे आहे. पण श्रेष्ठी जो आदेश देतील, त्याचे प्रश्‍न न करता पालन करायचे आहे, असे नानांनी सांगितले. हे बोलत असताना मंत्रिपदाची त्याची सुप्त इच्छा लपून राहिली नाही. मात्र त्यांनी त्याला ‘पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील”, असे उत्तर दिले. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार नाना पटोलेंचे ऊर्जामंत्रीपद जवळजवळ पक्के असल्याचे मानले जात आहे.