तर विरोधी पक्षाला महाराष्ट्राचं राजकारण नीट कळलेलं नाही: संजय राऊत
राजकारण

तर विरोधी पक्षाला महाराष्ट्राचं राजकारण नीट कळलेलं नाही: संजय राऊत

मुंबई : “फक्त राजीनामा, बदली हेच विरोधी पक्षांचं काम आहे का? लोकशाहीत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या बरोबरीने एकप्रकारे सरकारच चालवायचं असतं. तुम्हाला जर राजीनामा किंवा बदलीमध्येच समाधान मानायचं असेल, तर महाराष्ट्राचं राजकारण विरोधी पक्षांना नीट कळलेलं नाही”, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्ष असलेल्या भाजपावर आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर काही दिवसांपूर्वी एका गाडीत स्फोटकांचा मोठा साठ जप्त करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणात सापडलेल्या गाडीच्या मालकाचा मृतदेह मुंब्रा खाडीत आढळून आला. या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी सचिन वझे यांच्यावर आरोपप्रत्यारोप सुरु झाले असून वझे यांच्या निलंबनाची मागणी विरोधी पक्षाने केली आहे. या प्रकरणी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बराच गदारोळ पाहायला मिळाला. त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांना सचिन वाझेंची बदली केल्याचं जाहीर करावं लागलं. अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरल्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली आहे. तसेच, सचिन वाझे यांचं देखील कौतुक केलं आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, “सचिन वझे हे निष्णात तपास अधिकारी आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी दोन प्रमुख प्रकरणांना हात घातला. अन्वय नाईक हे दडपलेलं प्रकरण वाझेंनी उघडकीस आणलं होतं. संबंधित व्हाईट कॉलर आरोपींना अटक केली. हा देखील अन्वय नाईक कुटुंबीयांना न्यायच झालाय. त्याबद्दल विरोधी पक्ष बोलत नाहीत. टीआरपी घोटाळ्यातही त्यांनी कारवाई केली. सचिन वाझेंना लक्ष्य केलं जात आहे. या दोन प्रकरणात त्यांनी आरोपी तुरुंगात टाकले, हा मुद्दा त्यामागे असू शकतो”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून संजय राऊत यांनी केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपावर निशाणा साधला. “अंबानी उद्योगपती असतील, पण सामान्य माणसाच्या जीवाला देखील तेवढीच किंमत आहे. अन्वय नाईक, मोहन डेलकर यांच्या जीवाला किंमत नव्हती का? रोज गाजीपुरच्या सीमेवर १० ते १२ शेतकरी मरत आहेत. तिथेही कुणी स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या तरच गांभीर्य कळणार आहे का?”, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

आधी अंबानींच्या अँटिलिया घराबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ कार आणि जिलेटिनच्या कांड्या, त्यानंतर कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू आणि आता सचिन वाझेंवर झालेले आरोप आणि त्यांची बदली यावरून राज्याच्या राजकारणात आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. मंगळवारी विरोधी पक्ष असलेल्या भाजपानं अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मुद्द्यावरून मोठा गोंधळ घातला.