अनिल देशमुख आणि अशोक चव्हाण यांच्याविरोधात देवेंद्र फडणवीसांकडून हक्कभंगाचा प्रस्ताव
राजकारण

अनिल देशमुख आणि अशोक चव्हाण यांच्याविरोधात देवेंद्र फडणवीसांकडून हक्कभंगाचा प्रस्ताव

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. मंगळवारी राज्याचे अनिल देशमुख यांनी “देवेंद्र फडणवीसांनी अन्वय नाईक प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला”, असा दावा विधानसभेत केल्यानंतर मोठा गदारोळ झाला. आता यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात हक्कभंग आणला आहे. इतकेच नव्हे तर, मराठा आरक्षणावरून दिशाभूल करण्याचा आरोप करत राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात देखील देवेंद्र फडणवीस यांनी हक्कभंगाची नोटीस दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशमुख यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ दिला. ते म्हणाले की, ”अन्वय नाईक यांची हत्या झाली नसून आत्महत्या आहे. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी निकाल देताना आत्महत्येस प्रवृत्त केलं नसल्याचं स्पष्टपणे म्हटलं आहे. त्यामुळे हे प्रकरण दाबलं असं म्हणणं चुकीचं आहे. मी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सभागृहातदेखील सांगितला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असतानाही अशा प्रकारचं विधान देशमुख यांनी केलं. हे विधान न्यायालयाचा अवमान करणारं आहे. शिवाय ही बाब आपण काल निदर्शनास आणून दिल्यानंतर सुद्धा ते वारंवार तेच बोलत राहिले. असे करून अनिल देशमुख यांनी माझ्या बोलण्यावर बंधने आणून माझा विशेषाधिकार भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करावी, अशी मागणी मी सभागृहात केली आहे”.

तर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याविरोधात देखील देवेंद्र फडणवीस यांनी हक्कभंगाची नोटीस बजावली आहे. “मराठा आरक्षणावर आज अशोक चव्हाण यांनी अतिशय दिशाभूल करणारे निवेदन सभागृहात केले. १०२ व्या घटनादुरुस्तीचा उल्लेख हा सर्वोच्च न्यायालयात मुकुल रोहतगी यांनी केला होता. केंद्र सरकारच्या वतीने अटर्नी जनरल यांनी जे सांगितले नाही, ते त्यांनी सभागृहात सांगितले. १०२ व्या घटनादुरुस्तीचा महाराष्ट्राच्या कायद्यावर परिणाम होणार नाही, हे उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. त्यावर २ पाने लिहिली आहेत. मात्र या सर्व बाबी विचारात न घेता अशोक चव्हाण महाराष्ट्राची आणि मराठा समाजाची दिशाभूल करताना स्वतःच्या अज्ञानाचे प्रदर्शन करीत आहेत”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.