नाना पटोलेंची महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड निश्चित; लवकरच अधिकृत घोषणा
राजकारण

नाना पटोलेंची महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड निश्चित; लवकरच अधिकृत घोषणा

नवी दिल्ली : गेल्या दोन आठवड्यांपासून काँग्रेसमध्ये ही अंतर्गत बदलाची प्रक्रिया सुरु होती. मात्र आता महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या नावावर शिकामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली हाय कमांडने नाना यांच्या नावावर शिकामोर्तब केले पुढच्या दोन ते तीन दिवसात कधीही नाना पटोले यांच्या निवडीबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. नाना पटोले यांच्या रुपाने काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष हा विदर्भातून असेल.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तथापि, नाना पटोले यांचं नाव निश्चित झाल्याने आता महाराष्ट्रात विधानसभेचा नवा अध्यक्ष देखील बदलावा लागणार हे उघड आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदासाठी राजीव सातव, विजय वडेट्टीवार यांचीही नावे चर्चेत होती. मात्र काँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी यांच्या पुनरागमनाची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राजीव सातव यांना दिल्लीतून सोडण्यास हायकमांडने नकार दिला आहे. विजय वडेट्टीवार यांच्याबाबतही काँग्रेसमधला एक वरिष्ठ नेत्याचा गट सक्रिय होता. मात्र या दोघांऐवजी नाना पटोले यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

दरम्यान, बाळासाहेब थोरातांकडे मंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्ष अशी दुहेरी जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी दुसऱ्या नेत्याची नेमणूक करावी अशी मागणी कॉंग्रेस कडून केली जात होती. त्यासाठी राज्यातील काँग्रेसचे काही नेते सतत दिल्लीत जाऊन प्रदेशाध्यक्ष बदलावे यासाठी हायकमांडकडे लॉबिंग करत होते अशी चर्चा होती. प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी आणि त्यावरुन दिल्लीत होणारी चर्चा यामुळे अखेरीस बाळासाहेब थोरात यांनी स्वतःहून पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आले आहे.

बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यानंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची नावं चर्चेत आहेत, यात मुख्यत: विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे, विदर्भात काँग्रेसला मिळालेलं यश पाहता विदर्भातून नाना पटोले, नितीन राऊत, यशोमती ठाकूर तर मराठवाड्यातून अमित देशमुख यांचेही नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चेत आहे, बाळासाहेब थोरात हे कडवट काँग्रेसी आहेत, त्यांनी कधीही पक्षातील पदासाठी लॉबिंग केली नव्हती.