महेंद्रसिंह धोनीला डबल झटका; पराभवानंतर कारवाई
क्रीडा

महेंद्रसिंह धोनीला डबल झटका; पराभवानंतर कारवाई

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सकडून चेन्नई सुपर किंग्सचा पराभव झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीला आणखी एक झटका बसला आहे. सामन्यात स्लो-ओव्हर रेटसाठी धोनीविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. महेंद्रसिंह धोनीला एकूण १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चेन्नई संघाने दिल्लीसमोर १८९ धावांचं लक्ष्य दिलं होतं. हे लक्ष्य गाठण्यासाठी दिल्लीचा संघ आक्रमकपणे मैदानात उतरला होता. चेन्नईच्या गोलंदाजांची अक्षरश: धुलाई सुरु केली होती. त्यामुळे नेमका कोणत्या गोलंदाजाच्या हाती चेंडू द्यायचा असा प्रश्न चेन्नईचा संघाला पडला असावा. त्यामुळे रणनिती आखताना चेन्नईच्या संघाला निर्धारित वेळेत गोलंदाजी करण्याचं भान राहिलं नाही.

बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार प्रत्येक संघाला खेळण्यासाठी ९० मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे. या ९० मिनिटांमध्ये अडीच मिनिटांचे दोन टाइम आउट देण्यात आलेत. म्हणजे ८५ मिनिटांमध्ये २० षटकांचा खेळ संपवणं अपेक्षित आहे. अर्थात प्रत्येक तासाला ओव्हर रेट हा १४.१ असा असायला हवा. मात्र या नव्या नियमांचं चेन्नईच्या संघाकडून उल्लंघन झालं. सामन्यात चेन्नईच्या संघाने १८.४ षटकं टाकली आणि दिल्लीच्या संघाने ८ चेंडू राखत १८९ धावांचं लक्ष गाठलं.