दिल्ली कॅपिटल्सचा पंजाबवर 6 गडी राखून विजय
क्रीडा

दिल्ली कॅपिटल्सचा पंजाबवर 6 गडी राखून विजय

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जच्या 196 धावसंख्येच्या आव्हानाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनच्या 92 धावांच्या शानदार खेळीमुळे 6 गडी राखून विजय मिळवला. नाणेफेक गमावलेल्या पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 195 धावा केल्या होत्या. पंजाबचा कर्णधार के एल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी अर्धशतके रचत संघासाठी बहुमुल्य योगदान दिले. मात्र, पंजाबचे गोलंदाज दिल्लीच्या फलंदाजांवर लगाम घालू शकले नाहीत. धवनला सामनावीर पुरस्कार मिळाला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

धवन बाद झाल्यानंतर कर्णधार ऋषभ पंत आणि मार्कस स्टॉइनिस यांनी छोटेखानी भागीदारी रचली. शेवटची 3 षटके बाकी असताना रिचर्ड्सनने पंतला बाद केले. त्यानंतर ललित यादव आणि स्टॉइनिस यांनी 18.4 षटकातच संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. स्टॉइनिसने 13 चेंडूत नाबाद 27 धावा केल्या. पंजाबकडून झाय रिचर्ड्सनला सर्वाधिक 2 बळी मिळाले.

तत्पूर्वी, बर्थडे बॉय के एल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी पंजाबच्या डावाची दमदार सुरुवात केली. मयंकने सुंदर फटके खेळत संघाची धावसंख्या वाढवली. 13व्या षटकात दिल्लीला पहिले यश मिळाले. मेरीवालाने स्थिरावलेल्या मयंकला बाद केले. मयंकने 36 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांसह 69 धावांची खेळी केली. मयंक-राहुलने पंजाबसाठी 122 धावांची भागीदारी उभारली. मयंक बाद झाल्यानंतर राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले. 16व्या षटकात राहुल रबाडाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. राहुलने 7 चौकार आणि 2 षटकारांसह 61 धावांची खेळी केली. राहुलनंतर गेलही लवकर तंबूत परतला. गेल परतल्यानंतर दिल्लीने पंजाबला जास्त धावा काढू दिल्या नाहीत. पूरनही 19व्या षटकात आवेश खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. शाहरुख खानने 20व्या षटकात केलेल्या फटकेबाजीमुळे पंजाबला दोनशे धावांच्या जवळ जाता आले.