कुस्तीपटू सुशील कुमारविरोधात अजामीनपात्र वॉरंट
क्रीडा

कुस्तीपटू सुशील कुमारविरोधात अजामीनपात्र वॉरंट

नवी दिल्ली : भारताचा कुस्तीपटू सुशील कुमारविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. दिल्लीमध्ये झालेल्या खुनाच्या घटनेमध्ये दिल्ली पोलीस सुशील कुमारचा शोध घेत आहेत. मात्र, ही घटना उघड झाल्यापासून सुशील कुमार पोलिसांना सापडला नसल्यामुळे त्याच्याविरोधात आधी पोलिसांनी लुकआऊट नोटीस काढली होती. त्यानंतर देखील सुशील कुमारचा शोध न लागल्यामुळे त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

४ मे रोजी दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमच्या आवारात सागर राणा या २३ वर्षीय कुस्तीपटूची हत्या झाली होती. त्या प्रकरणात पोलीस सुशील कुमार याच्यासह इतर आरोपींचा शोध घेत आहेत. छत्रसाल स्टेडियममध्ये आलेले ते आमचे कुस्तीपटू नव्हते. आम्ही त्यासंदर्भात पोलिसांना देखील माहिती दिली आहे. काही अज्ञात लोकांनी अवैधरीत्या प्रवेश केला आणि आमच्याशी वाद घातला. या घटनेशी आमचा काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया सुशील कुमारने यासंदर्भात दिली होती.

नेमकं काय आहे प्रकरण?
४ मे रोजी दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमच्या बाहेर सुशील कुमार आणि त्याच्या काही सहकाऱ्यांचा सागर राणा याच्यासोबत वाद झाला. या वादाचं पर्यवसान हाणामारीत झालं. यामध्ये दोन जण जखमी देखील झाले. सागरला रुग्णालयात गेल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केलं. मॉडेल टाऊन परिसरातल्या एका फ्लॅटवरून हा वाद झाल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने अधिक तपास सुरू केला आहे.