भारताला जगज्जेतेपदाची हुलकावणी; न्यूझीलंडकडे कसोटी अजिंक्यपदाची पहिली गदा
क्रीडा

भारताला जगज्जेतेपदाची हुलकावणी; न्यूझीलंडकडे कसोटी अजिंक्यपदाची पहिली गदा

साऊदम्पटन : कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षांच्या इतिहासात प्रथमच झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाने भारताला हुलकावणी दिली. जगजेतेपदाची गदा उंचावण्यात २०१५ आणि २०१९च्या एकदिवसीय प्रकाराचे विश्वचषक निसटलेल्या केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडला यश आले. २०१४ची ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा आणि २०१७च्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेनंतर तिसऱ्यांदा भारताला जागतिक विजेतेपदाने हुलकावणी दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांच्या त्रिकुटाने भारताचा दुसरा डाव १७० धावांत गुंडाळला. मग विल्यम्सनने (नाबाद ५२) अनुभवी रॉस टेलरच्या (नाबाद ४७) साथीने भारताचे १३९ धावांचे विजयी लक्ष्य ४५.५ षटकांत दोन फलंदाजांच्या मोबदल्यात आरामात पार केले. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर स्क्वेअर लेगला चौकार खेचून टेलरने न्यूझीलंडच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. टिम साऊदी, ट्रेंट बोल्ट आणि कायले जॅमीसन या न्यूझीलंडच्या वेगवान माऱ्याने भारताला मर्यादित धावसंख्येवर रोखण्यात यश मिळवले.

भारताने २ बाद ६४ धावसंख्येवरून दुसऱ्या डावाला पुढे प्रारंभ केला. टिम साऊदीने पाचव्या दिवसाच्या उत्तरार्धात भारताच्या दोन्ही सलामीवीरांना तंबूत पाठवले होते. कायले जॅमीसनने विराट कोहली (१३) आणि चेतेश्वर पुजारा (१५) यांना बाद करून सामन्यातील रंगत वाढवली. मग ट्रेंट बोल्टने भरवशाचा फलंदाज अजिंक्य रहाणेला (१५) यष्टीरक्षक बीजे वॉटलिंगकरवी झेलबाद करीत भारताला आणखी एक धक्का दिला. निम्मा संघ १०९ धावसंख्येवर गारद झाल्यानंतर पंतने रवींद्र जडेजाच्या साथीने संघाचा डाव सावरला. पंत ५ धावांवर असताना जॅमीसनच्या गोलंदाजीवर साऊदीने दुसऱ्या स्लिपमध्ये त्याचा झेल सोडला, तोच त्यांना महागात पडला. नील वॉगनरने जडेजाला अचूक चेंडू टाकून चूक करायला भाग पाडले. मग पंतही बोल्टकडे झेल देऊन माघारी परतला. बोल्टने रविचंद्रन अश्विनही (७) धावांवर बाद झाला. तर साऊदीने मोहम्मद शमी (१३) आणि जसप्रित बुमराह (०) यांना बाद करून भारताच्या दुसऱ्या डावापुढे १७० धावांवर पूर्णविराम दिला.

न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात टॉम लॅथम (९) आणि डेव्हॉन कॉन्वे (१९) यांनी ३३ धावांची सलामी दिली. परंतु अश्विनने दोघांनाही बाद करून न्यूझीलंडची २ बाद ४४ अशी अवस्था केली. मग विल्यम्सन आणि टेलर यांनी तिसऱ्या गड्यासाठी ९६ धावांची अभेद्य भागीदारी करून न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक
भारत (पहिला डाव) : २१७
न्यूझीलंड (पहिला डाव) : २४९
भारत (दुसरा डाव) : ६३ षटकांत सर्व बाद १७० (ऋषभ पंत ४१, रोहित शर्मा ३०; टिम साऊदी ४/४८, ट्रेंट बोल्ट ३/३९)
न्यूझीलंड (दुसरा डाव) : ४५.५ षटकांत २ बाद १४० (केन विल्यम्सन नाबाद ५२, रॉस टेलर नाबाद ४७; रविचंद्रन अश्विन २/१७)