देशाचा पहिला हिंदकेसरी हरपला; ज्येष्ठ कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांचे निधन
क्रीडा

देशाचा पहिला हिंदकेसरी हरपला; ज्येष्ठ कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांचे निधन

कोल्हापूर : ज्येष्ठ कुस्तीपटू भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे (वय 86) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. श्रीपती खंचनाळे यांनी सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वायोमानाने प्रकृती बिघडल्याने श्रीपती खंचनाळे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातलं मोठं नाव आणि पहिला मानाचा हिंदकेसरी किताब पटकावणारे म्हणून श्रीपती खंचनाळे यांची ओळख होती. खंचनाळे हे मूळचे सीमाभागातील चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा गावचे होते. श्रीपती खंचनाळे यांचा जन्म १० डिसेंबर १९३४ रोजी शेतकरी कुटुंबात झाला होता. १९५९ साली पंजाब केसरी बनाता सिंगला धोबीपछाड देत श्रीपती खंचनाळे यांनी हिंदकेसरची गदा पटकावत कोल्हापूरचं नाव उज्वल केलं. त्याचवर्षी आनंद शिरसागर यांना पराभूत करत त्यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धाही जिंकली होती.

त्यानंतर १९५८, १९६२ आणि १९६५ साली झालेल्या ऑल इंडिया चॅम्पिअनशीप स्पर्धेची विजेतेपदही खंचनाळे यांनी पटकावली होती. विविध कुस्ती स्पर्धांत त्यांनी कोल्हापूरचा डंका देशभर वाजविला. नवीन मल्लांना तालमीत धडे देण्याचे काम ते करीत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मल्लांनी विविध कुस्ती मैदाने गाजवली होती.

ते कित्येक वर्षांपासून कोल्हापुरात वास्तव्यास होते. आपल्या कारकिर्दीत शाहुपुरीत कुस्तीचे धडे गिरवणाऱ्या खंचनाळे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या कुस्तीक्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे. खंचनाळे यांचं पार्थिव कोल्हापुरातील शाहुपुरीत पैलवानांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर त्यांचं पार्थिव हे त्यांच्या रुईकर कॉलनी येथील निवासस्थानी नेण्यात येईल.