सरकार आणि शेतकऱ्यांमधील परिस्थिती भारत-पाकिस्तानसारखी; अण्णा हजारेंचा केंद्रावर निशाणा
देश बातमी

सरकार आणि शेतकऱ्यांमधील परिस्थिती भारत-पाकिस्तानसारखी; अण्णा हजारेंचा केंद्रावर निशाणा

राळेगणसिद्धी : “सरकार आणि शेतकऱ्यांमधील सध्याची परिस्थिती ही भारत-पाकिस्तानसारखी झाली आहे. शेतकऱ्यांचं न ऐकायला ते काय पाकिस्तानातून आलेत का?” असा खोचक सवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी विचारला आहे. केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात उडी घेत पाठींबाही दर्शवला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अण्णा हजारे म्हणाले, “कृषीप्रधान देशात शेतकऱ्याला सरकारकडून दिली जाणारी ही अमानूष वागणूक योग्य नाही. निवडणूक आली की राजकारणी लोक शेतकऱ्यांच्या दारावर जातात आणि मतं मागतात, मग शेतकऱ्यांच्या मागण्या का ऐकून घेतल्या जात नाहीत? शेतकऱ्यांवर लाठीमार केला जातो. पाण्याचे फवारे मारले जातात. यात एका शेतकऱ्याचा मृत्यू देखील झाला आहे. यातून आणखी हिंसा भडकली त्याला जबाबदार कोण?” असा सवाल उपस्थित करत हजारे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

“निवडणुकीच्या वेळी मतं मागायला शेतकऱ्यांच्या बांधावर जाता, मग शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना त्यांच्याशी चर्चा करायला का जात नाही? दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी काय पाकिस्तानातून आलेत का? उद्या जर हिंसा भडकली तर त्याला जबाबदार कोण?” असा रोखठोक सवाल अण्णा हजारे यांनी विचारला आहे.

दरम्यान, कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरियाणातील शेतकरी ‘दिल्ली चलो’ आंदोलनातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शेतकरी संघटनांना दिलेला चर्चेचा प्रस्तावही धुडकावून लावला आहे. तसेच. शेतकऱ्यांनी आंदोलनासाठी दिल्ली-हरियाणाच्या सीमेवर बुराडी मैदानात न जाता दिल्लीच्या सिंधु सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. त्यामुळे आंदोलन आणखी पेटण्याची शक्यता आहे.