ममता बॅनर्जींना दुसरा झटका; एकसोबत पाच नेत्यांचे राजीनामे
राजकारण

ममता बॅनर्जींना दुसरा झटका; एकसोबत पाच नेत्यांचे राजीनामे

कोलकाता : तृणमूल काँग्रेस पक्षाला एकामागून एक झटके बसताना दिसत आहेत. पक्षाचे नेते सुवेंदू यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षात पडझड सुरू झाली असून, २४ तासातच तृणमूलला दुसरा हादरा बसला आहे. तृणमूल काँग्रेसमधील पाच स्थानिक नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. तृणमूल काँग्रेसचे गोबिंदपूर-महेशपूर, बामोण गोला, पकुआ हट, जोग्गोडोल आणि चांदपूर येथील अध्यक्षांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. जिल्हाध्यक्ष मोसम नूर आणि जिल्हा समन्वयक बाबला सरकार यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पक्षामध्ये सन्मान मिळत नसल्याने लोकांची कामं करता येत नाही, त्यामुळे राजीनामा देत असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. राजीनामे महत्त्वाचे नसून, प्रत्येक विभागात समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. बामोणगोला विभागातही पाच समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत, असं तृणमूल काँग्रेसचे मालदाचे जिल्हा समन्वयक बाबला सरकार यांनी सांगितलं.

यापूर्वी पक्षावर नाराज असलेल्या सुवेंदू अधिकारी यांनी ममतांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अधिकारी यांनी बुधवारी आमदारकीचाही राजीनामा दिला. त्यानंतर ते भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. १९ डिसेंबरला अधिकारी भाजपात प्रवेश करणार असल्याचं वृत्त असून, हा तृणमूलला मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे तृणमूलनं भाजपवर नेत्यांना फोडत असल्याचा आरोप करत निशाणा साधला आहे.