भाजपला झटका; या नेत्याने केला शिवसेनेत प्रवेश
राजकारण

भाजपला झटका; या नेत्याने केला शिवसेनेत प्रवेश

मुंबई : मुंबईत भाजपला जोरदार झटका बसला आहे. भाजप नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हेगडे यांनी शिवबंधन बांधले. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी आपल्या खांद्यावर शिवसेनेचा भगवा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मागील काही काळापासून ते भाजपमध्ये अस्वस्थ असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा यांनी बलात्काराची तक्रार दिल्यानंतर, कृष्णा हेगडे यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहून रेणू शर्मावर कारवाईची देखील मागणी केली होती. एवढेच नाही तर रेणू शर्मा यांनी आपल्यालाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले होते.

कृष्णा हेगडे हे मूळचे काँग्रेसचे आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता ते शिवसेनेत दाखल झाले आहेत. माजी आमदार असलेल्या कृष्णा हेगडे यांनी, काँग्रेसच्या तिकिटावर विलेपार्ल्यातून विधानसभेची निवडणूक जिंकली होती. चार वर्षांपूर्वी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आपण शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचे हेगडे यांनी यावेळी सांगितले आहे.