अग्रलेख लिहिण्याचं कारण काय ते सांगा मी सगळंच बाहेर काढतो; अण्णा हजारे
राजकारण

 अग्रलेख लिहिण्याचं कारण काय ते सांगा मी सगळंच बाहेर काढतो; अण्णा हजारे

अहमदनगर : ”कोणा एका पक्षापेक्षा आम्ही समाज आणि देशाला प्राधान्य देतो. अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखात मांडण्याच आलेल्या मुद्द्यांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच, तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही तो कसा पाठीशी घातला याबाबतची सगळी माहितीच देईन असा इशाराच अण्णांनी दिला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आजचा अग्रलेख लिहिण्याचं कारण काय ते सांगा मी सगळंच बाहेर काढतो असं म्हणत अण्णांनी शिवसेनेची चांगलीच कानउघडणी केली. तर समाज आणि देशाच्या दृष्टीनं घातक कृत्य घडतात तेव्हा आम्ही आंदोलन करतो. भाजप सत्तेवर असतानाही माझी 6 आंदोलनं झालीच याचा विसर कसा पडला, असा उलट सवाल त्यांनी शिवसेनेला केला. अण्णांनी उपोषण जाहीर करुन ते मागे घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, असं म्हणत त्यांनी उपोषणामागच्या हेतूवरच निशाणा साधला. ज्यावर आता खुदद् अण्णांनीच आक्रमक भूमिका घेत प्रत्युत्तर दिलं.

दरम्यान, शेतकरी आंदोलनाचा पाठिंबा दर्शवत अण्णा हजारे आजपासून राळेगणसिद्धी येथे उपोषणाला बसणार होते. मात्र उपोषणापूर्वीच अण्णांनी माघार घेतली. भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मनधरणीचा अण्णांवर प्रभाव पडला आणि त्यांनी हा निर्णय़ घेतला. यामागची कारणंही त्यांनी स्पष्ट केली. पण, शिवसेनेक़डून मात्र अण्णांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आल्याने अण्णांनी शिवसेनेवर चांगलीच आगपाखड केली आहे.

काय म्हंटले आहे अग्रलेखात
लोकशाही, शेतकऱ्यांचे आंदोलन, शेतकऱ्यांचा स्वाभिमान याबाबत अण्णांना भूमिका घ्यावीच लागेल. राळेगणात बसून भाजपच्या नेत्यांसोबत प्रस्ताव आणि चर्चेच्या फेऱ्या करून काय उपयोग? अण्णांनी आधी उपोषण जाहीर केले आणि आता केंद्र सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून ते स्थगित केले. हे सगळे ठीक आहे, पण शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त करणाऱ्या कृषी कायद्यांबाबत त्यांची भूमिका काय आहे? या कायद्यांविरोधात सिंघू बॉर्डरवर मरमिटण्यास तयार असलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना अण्णांचा पाठिंबा आहे का? अण्णा नक्की कोणाच्या बाजूने? या सर्व प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या!

शेतकऱयांच्या प्रश्नांवर अण्णा हजारे यांनी निर्णायक उपोषणाची घोषणा केली होती व अण्णांनी उपोषण करू नये म्हणून महाराष्ट्रातील भाजप पुढारी राळेगणसिद्धीत जाऊन अण्णांशी चर्चा करीत होते. हे चित्र तसे गमतीचेच होते आणि घडलेही अपेक्षेप्रमाणेच. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर अण्णांनी उपोषण स्थगित केले. ‘केंद्र सरकारला आपण शेतकऱयांशी संबंधित 15 मुद्दे दिले आहेत. त्यावर केंद्र सरकार नेमणार असलेल्या उच्चस्तरीय समितीमध्ये योग्य ते निर्णय होतील असा आपल्याला विश्वास वाटतो, म्हणून आपण आपले उपोषण स्थगित करीत आहोत,’ असे अण्णांनी सांगितले. अण्णांनी उपोषणाचे अस्त्र बाहेर काढायचे आणि नंतर ते म्यान करायचे असे यापूर्वीही घडले आहे. त्यामुळे आताही ते घडले तर त्यात अनपेक्षित असे काही नाही. भाजप नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांमुळे अण्णांचे समाधान झाले असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. मूळ प्रश्न आहे तो सध्या शेतकऱयांच्या बाबतीत जे दमनचक्र सुरू आहे, कृषी कायद्यांची जी दहशत निर्माण झाली आहे त्याचा. यासंदर्भात एक निर्णायक भूमिका अण्णा घेत आहेत आणि त्यादृष्टीनेच उपोषण करीत आहेत असे एक चित्र निर्माण झाले होते. मात्र अण्णांनी उपोषण मागे घेतले आहे. त्यामुळे कृषी कायद्यांबाबत त्यांची नेमकी भूमिका काय हे तूर्त तरी अस्पष्टच आहे. शेतकऱयांचा विषय राष्ट्रीय आहे. लाखो शेतकरी सिंघू बॉर्डरवर साठ दिवसांपासून सरकारशी संघर्ष करीत आहेत. सरकार आता त्यांचे आंदोलन चिरडायला निघाले आहे. गाझीपूर बॉर्डरवर सरकारने शेतकऱयांची कोंडी केली आहे. वीज, पाणी, अन्नधान्याची रसद कापली आहे. शेतकरी हे जणू आंतरराष्ट्रीय भगोडे आहेत, अमली पदार्थांचे आर्थिक गुन्हेगार आहेत असे ठरवून त्यांना ‘लुकआऊट’ नोटीस बजाविण्यात आली आहे.