तिसऱ्या दिवसअखेर मेलबर्न कसोटीवर भारताची पकड; ऑस्ट्रेलिया ६ बाद १३३
क्रीडा

तिसऱ्या दिवसअखेर मेलबर्न कसोटीवर भारताची पकड; ऑस्ट्रेलिया ६ बाद १३३

मेलबर्न : तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटी सामन्यावर आपली पकड बसवली आहे. पहिल्या डावात भारतीय संघाने ३२६ धावांपर्यंत मजल मारत १३१ धावांची आघाडी घेतली आहे. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी धाडत तिसऱ्याच दिवशी रंगतदार परिस्थिती निर्माण केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कॅमरुन ग्रीन आणि पॅट कमिन्स हे धावपटीवर असून त्यांनी नाबाद ३४ धावांची भागीदारी करत अखेरचं सत्र खेळून काढत कांगारुंना २ धावांची नाममात्र आघाडी मिळवून दिली आहे. दिवसाअखेरीस ऑस्ट्रेलियाच्या संघाने ६ गडी बाद १३३ धावांपर्यंत मजल मारली आहे. ऑस्ट्रलियाच्या डावाची सुरवात खराब झाली. सलामीवीर जो बर्न्स उमेश यादवच्या गोलंदाजीवर ४ धावा काढून माघारी परतला. यानंतर मॅथ्यू वेड आणि मार्नस लाबुशेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. लाबुशेन मैदानावर स्थिरावतोय असं वाटत असतानाच आश्विनने त्याला कर्णधार रहाणेकरवी झेलबाद करत कांगारुंना दुसरा धक्का दिला. लाबुशेनने २८ धावा केल्या.

तिसऱ्या सत्रात जसप्रीत बुमराहने स्मिथला माघारी धाडत भारताला महत्वाचा बळी मिळवून दिला. पहिल्या कसोटीप्रमाणे दुसऱ्या कसोटी सामन्यातही स्मिथ अपयशी ठरला, अवघ्या ८ धावा काढून तो बाद झाला. यानंतर ठराविक अंतराने मॅथ्यू वेड, ट्रॅविस हेड आणि कर्णधार टीम पेन यांना माघारी धाडण्यात भारताला यश आलं. यानंतर ग्रीन आणि कमिन्स यांनी भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत संघावर डावाने पराभवाची नामुष्की टाळली. तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताकडून रविंद्र जाडेजाने २ तर बुमराह-यादव-सिराज आणि आश्विन या चौकडीने प्रत्येकी १-१ बळी घेतला.