शरद पवार जर युपीएचे अध्यक्ष झाले तर…’ संजय राऊतांचे सूचक विधान
राजकारण

शरद पवार जर युपीएचे अध्यक्ष झाले तर…’ संजय राऊतांचे सूचक विधान

नवी मुंबई : “शरद पवार जर युपीएचे अध्यक्ष झाले तर आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. पण मला अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. शरद पवारांनीही हे वृत्त नाकारलं आहे. ते महाराष्ट्राचे, देशाचे खूप मोठे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करत आहोत. पण जेव्हा युपीए अध्यक्षपदाबाबत आपण बोलत आहोत तेव्हा तसा कोणाताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. ही गोष्ट जर शरद पवारांनी स्वत: सांगितली असेल तर त्यावर चर्चा करणं योग्य नाही”. असे स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष होणार असल्याची चर्चा गुरुवारी दिल्लीत रंगली होती. मात्र या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका स्पष्ट करत या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. शरद पवार यूपीएचे अध्यक्ष होण्याबाबत कुठलीही चर्चा झाली नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं आहे.

दरम्यान, याबाबत माध्यमांनी ज्याप्रकारे महाराष्ट्रात महाविकास आघाडी झाली त्याच प्रकारे केंद्रात आघाडी होऊ शकते का? त्याचं नेतृत्व कोण करणार? असे प्रश्न संजय राऊतांना विचारले असता ते म्हणाले की, ”एकत्र येऊन युपीएला मजबूत करावं लागेल. आम्ही तर नेहमीच हितचिंतक राहिलो आहोत. जर असा कोणता प्रस्ताव आला तर त्याचं समर्थन करु,” असंही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.

तसेच, “राजकारणात काहीही होऊ शकतं. राष्ट्राचं नेतृत्व करण्याची संपूर्ण क्षमता सध्या जर कुणामध्ये असेल तर ती शरद पवार यांच्यामध्ये आहे. प्रश्नांची तसंच देशाची जाण, लोकांची नाडी ओळखणं, खंबीरपणा या सर्व गोष्टी शरद पवार यांच्याकडे आहेत. त्यांचा अनुभव दांडगा आहे.”
“युपीएच्या अध्यक्षपदाबाबत बोलायचं झालं तर, शिवसेना काही यूपीएची सदस्य नाही. त्यामुळे मी कसं काय याबाबत मत व्यक्त करू? महाराष्ट्रातील महाविकासआघाडीत आम्ही आहोत. पण अद्याप आम्ही युपीएचे सदस्य नाही. त्यामुळे मी त्यावर मतप्रदर्शन करणार नाही. भविष्यात राजकारणात काय होईल. हे मी आत्ता सांगू शकत नाही.” असं देखील यावेळी राऊत म्हणाले.

तसेच, नव्या राजकीय वातावरणात विरोधकांना एकत्र येऊन काही निर्णय घ्यावे लागतील. काँग्रेस मोठा पक्ष आहे, पण लोकसभेत विरोधी पक्षाचं पद ते मिळवू शकले नाहीत हे सत्य आहे. अशा परिस्थितीत आपल्याला एकत्र येऊन युपीएला मजबूत करावं लागेल. ज्याप्रकारे महाराष्ट्रात महाविकास आघाडी झाली त्याच प्रकारे आघाडी होऊ शकते का? त्याचं नेतृत्व कोण करणार? या सगळ्या मोठ्या गोष्टी आहेत. त्यावरही निर्णय़ होतील,” असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.