भाजपला मोठा धक्का? राज्यपालांच्या बैठकीतून २४ आमदार गायब
राजकारण

भाजपला मोठा धक्का? राज्यपालांच्या बैठकीतून २४ आमदार गायब

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांनी नुकतीच राज्यपाल जगदीप धनखर यांची सुवेंदु अधिकारी यांच्यासोबत जाऊन भेट घेतली. मात्र या बैठकीमध्ये भाजपचे २४ आमदार अनुपस्थित असल्याने राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. बंगाल विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते असणाऱ्या सुवेंदु अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी राजभवनामध्ये पक्षाच्या आमदारांच्या एका प्रतिनिधिमंडळाने राज्यपालांची भेट घेतली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भाजप नेत्यांनी राज्यपालांसोबत घेतलेल्या बैठकीचा हेतू बंगालमध्ये सुरु असणाऱ्या अयोग्य घटनांबद्दलची माहिती राज्यपालांना देण्याचा आणि इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्याचा होता. मात्र भाजपाच्या ७४ पैकी २४ आमदार यावेळी गैरहजर होते. त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीआधी तृणमूलमधून भाजपमध्ये आलेले नेते पुन्हा घरवापसी करणार का? अशा पद्धतीच्या चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांपैकी काही आमदारांचा गट सुवेंदु अधिकारी यांचं नेतृत्व स्वीकारण्यास तयार नसल्याने भाजपामध्ये पक्षांतर्गत दुही असल्याचही सांगण्यात येत आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार अनेक भाजपा आमदार पुन्हा तृणमूलमध्ये प्रवेश करु शकतात. मागील आठवड्यामध्ये मुकुल रॉय यांनी भाजपमधून पुन्हा तृणमूलमध्ये प्रवेश केला. राजीव बॅनर्जी, दीपेंदु विश्वास आणि सुभ्रांशु रॉय यांच्यासहीत इतर अन्य नेते सुद्धा लवकरच तृणमूलमध्ये परततील असा अंदाज व्यक्त केला जातोय. मुकुल रॉय यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली असून त्यांनी कृष्णानगर उत्तर मतदारसंघातून विजय मिळवला आहे.