चित्रा वाघांना राष्ट्रवादीच्या नेत्याचे प्रत्युत्तर; आपण साहेबांच्या तालमीत तयार झाल्या आहात, त्यामुळे…
राजकारण

चित्रा वाघांना राष्ट्रवादीच्या नेत्याचे प्रत्युत्तर; आपण साहेबांच्या तालमीत तयार झाल्या आहात, त्यामुळे…

मुंबई : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. त्यानंतर चित्रा वाघ यांनी त्यांना छळलं जात असल्याचा आरोप केला. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सरकारला जाब विचारल्यामुळेच ही कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आता या आरोपाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अमोल मिटकरी यांनी ट्विट करत चित्रा वाघ यांचा मुद्दा खोडून काढला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अमोल मिटकरी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये चित्रा वाघ यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “किशोर वाघ सरांवर 12 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला आहे. भाजपने 2016 मध्येच याप्रकरणी खुली चौकशी सुरू केली होती. आपण साहेबांच्या तालमीत तयार झाल्या आहात. त्यामुळे दिशाभूल करू नये,” असा टोला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना लगावला. तसेच चित्रा वाघ यांनी भाजपत प्रवेश केला नसता तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या प्रकरणी गुन्हा दाखल केला असता, असा दावाही त्यांनी केला. ही बाजू मांडताना त्यांनी एसीबीने दाखल केलेल्या गुन्ह्याची एफआरआयची कॉपीसुद्धा ट्विटरवर पोस्ट केली आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी चित्र वाघ खूपच आक्रमक झाल्या आहेत. या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर त्या रोज पत्रकार परिषद घेऊन सरकारला धारेवर धरत आहेत. तसेच वनमंत्री संजय राठोड यांच्यावर जोपर्यंत कारवाई होणार नाही, तोपर्यंत शांत बसणार नसल्याचं वाघ यांनी यापूर्वी अनेकवेळा बोलून दाखवलं आहे. या पूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तालमीत तयार झाल्याचेही बोलून दाखवले होते. याच मुद्द्यावरुन अमोल मिटकरी यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. “तुम्ही भाजपमध्ये गेल्या नसता तर देवेंद्र फडणवीस यांनीच किशोर वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असता, तुम्ही शरद पवार यांच्या तालमीत तयार झाल्या आहात. तुम्ही लोकांची दिशाभूल करु नका,” असा टोला मिटकरी यांनी लगावला आहे.