शिवसेनेच्या चाणक्याची शरद पवारांनी घेतली भेट
राजकारण

शिवसेनेच्या चाणक्याची शरद पवारांनी घेतली भेट

मुंबई : शिवसेनेची धडाडती तोफ खासदार संजय राऊत यांची राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे हेही उपस्थित होते. संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी जाऊन या तिघांनी भेट घेतली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर नुकतीच अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर शनिवारी (५ डिसेंबर) संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली आहे. संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादीच्या काही दिग्गज नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि प्रकृतीची चौकशी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केल्यानंतर शरद पवार, अजित पवार आणि धनंजय मुंडे हे तिघे संजय राऊत यांच्या घरी गेले.

संजय राऊत यांच्यावर बुधवारी, २ डिसेंबरला लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. या शस्त्रक्रियेत त्यांच्या हृदयात दोन स्टेन टाकण्यात आले असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. खरे पाहता गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अँजिओप्लास्टीच्या वेळी एकूण तीन स्टेन टाकण्यात आले होते. यातील एक स्टेन खराब झाल्यामुळे आता पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे सांगण्यात आले.