राहुल गांधींचा मोठा निर्णय; पश्चिम बंगालमधील सर्व सभा रद्द
राजकारण

राहुल गांधींचा मोठा निर्णय; पश्चिम बंगालमधील सर्व सभा रद्द

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर वाढत असताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. राहुल गांधी यांनी सर्व राजकीय नेत्यांना अशा परिस्थितीत गर्दी करत प्रचारसभा घेण्यासंबंधी विचार करण्याचं आवाहन केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पश्चिम बंगालमध्ये शनिवारी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडलं. पाचव्या टप्प्यात एकूण ७९.१८ टक्के मतदानाची नोंद झाली. यानंतर राहुल गांधी यांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता महत्वाचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, कोरोनाची स्थिती लक्षात घेता मी पश्चिम बंगालमधील माझ्या सर्व प्रचारसभा रद्द करत आहे. मी सर्व राजकीय नेत्यांना सल्ला देऊ इच्छितो की, त्यांनी सध्याच्या परिस्थितीत मोठ्या गर्दीत सभा घेण्याच्या परिणामांचा गांभीर्याने विचार करावा.

काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींनी वारंवार भाजप नेत्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करुन सभा घेण्यावरुन टीकास्र सोडलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका करण्यात आली होती. मात्र यावेळी काँग्रेसचे नेतेही सभा घेत होते. दरम्यान राहुल गांधी यांनी सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर इतर काँग्रेस नेत्यांकडून स्वागत करण्यात येत असून सर्वांसमोर एक उदाहरण ठेवत असल्याचं म्हटलं आहे.