मोठी बातमी : दिग्गज नेत्यासह ५ खासदार भाजपच्या वाटेवर
राजकारण

मोठी बातमी : दिग्गज नेत्यासह ५ खासदार भाजपच्या वाटेवर

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. पक्षाच्या ५ खासदारांसह एक मोठा नेता भाजपच्या वाट्यावर असल्याची माहिती समोर आली आहे. तृणमूलचे नेते सुवेंदू अधिकारींनी मंत्रीपदापाठोपाठ आमदारकीचा राजीनामा दिल्याने पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काही दिवसांपूर्वीच भाजपाचे खासदार अर्जून सिंह यांनी तृणमूल काँग्रेसचे पाच खासदार भाजपात येणार असल्याचा दावा केला होता. सौगत रॉय यांच्यासह पाच खासदार तृणमूलचा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावेळी त्यांनी सुवेंदू अधिकारी यांच्या नावाचाही उल्लेख केला होता. ते पाच खासदार तृणमूल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे अर्जून सिंह यांनी सांगितले होते.

दरम्यान, अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मंत्रिपदाचा राजीनामा देण्याआधीपासूनच सुवेंदू अधिकारी भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मंत्रिपदापाठोपाठ अधिकारी यांनी आमदारकीचाही राजीनामा दिल्यानं, ते भाजपा जाणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुढील काही दिवसात अधिकारी भाजपात दाखल होणार असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे भाजपाकडून पक्षात प्रवेश करण्यासाठी नेत्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला आहे. अधिकारी यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपानं त्याचं स्वागत केलं आहे. त्याचबरोबर त्यांना भाजपात येण्याचंही आवाहनही केलं आहे.