शिवबंधन बांधताच उर्मिला मातोंडकरांनी दिली दणदणीत मुलाखत; कॉंग्रेस ते कंगनावर केलं भाष्य
राजकारण

शिवबंधन बांधताच उर्मिला मातोंडकरांनी दिली दणदणीत मुलाखत; कॉंग्रेस ते कंगनावर केलं भाष्य

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज मंगळवारी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. रश्मी ठाकरेंच्या हस्ते मनगटावर शिवबंधन बांधलं त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरवात केली. हाती शिवबंधन बांधल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेत दणदणीत मुलाखत दिली. यावेळी त्यांनी काँग्रेस ते कंगना अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, “मी काँग्रेस पक्ष सोडून 14 महिने झाले आहेत. मी जेव्हा काँग्रेसमधून बाहेर पडली तेव्हा पक्ष सोडत आहे पण लोकांकरीता काम करत राहील असं म्हटलं होतं. मी तेव्हा राजकारण सोडलं नव्हतं. आताही माझ्यात जितकी क्षमता आहे त्या क्षमतेने जमिनीवर उतरुन काम करण्याची माझी इच्छा आहे. कारण एसी रुममध्ये बसून या गोष्टी होतील असं वाटत नाही. आज मी लोकांकडून थोडा वेळ मागत आहे. मला थोडा वेळ द्या”, अशी विनंती अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी जनतेला केली.

दरम्यान, अभिनेत्री कंगना रनौतने शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेवर हल्लाबोल चढवला असताना उर्मिला यांनी ठाम भूमिका घेत कंगनाला सुनावलं होतं. याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या की, “कंगनाला अजिबात उत्तर देणार नाही. कंगनावर गरजेपेक्षा जास्त बोललं गेलं आहे. आता बोलायची गरज नाही. टीका करायला लोकशाही आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी कंगनाला उत्तर देण्यासाठी मुलाखत दिली नव्हती. त्या मुलाखतीचा तो एक भाग होता. बोलण्याच्या ओघात तसंच प्रश्नही कंगनाबाबत विचारला गेला. त्यामुळे तिच्यावर जास्त बोललं गेलं”, असं उर्मिला म्हणाल्या.

शिवसेनेने तुमच्यावर कोणती नवी जबाबदारी टाकली आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना त्या म्हणाल्या, “मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक म्हणूनच काम करायला आलेली आहे. शिवसेनेची महिला आघाडी भक्कम आहे. मला शिवसेनेचा भाग झाल्याचा आनंद आहे. मुंबईत महाराष्ट्र आणि जगभरातून असंख्य मुली येतात. त्यांचे आई-वडील अत्यंत आत्मविश्वासाने पाठवतात की, आमच्या मुली मुंबईत सुखरुप आहेत. मला अत्यंत आनंद आणि अभिमान हे की त्या मुंबई शहराचा मी भाग आहे. महिला सुरक्षेबाबतचे अनेक समस्या आहेत. त्यासाठी मला काम करायचे आहे”, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.