आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आहेत तीन पर्याय
क्रीडा

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आहेत तीन पर्याय

मुंबई : बायोबबलमधील चार संघांच्या सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे स्थगित करण्यात आलेली आयपीएल ट्वेन्टी-२० स्पर्धा आता भारताबाहेरच होणे शक्य आहे. याकरिता संयुक्त अरब अमिराती, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे तीन पर्याय उपलब्ध असल्याचे वृत्त काही इंग्रजी माध्यमांनी बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला असला तरी उर्वरित सामने परदेशात खेळवण्याचा प्रस्ताव भागधारकांना मान्य आहे. आमच्याकडे आयपीएलचे उर्वरित ३१ सामने पूर्ण करण्यासाठी आलेल्या प्रस्तावांचा आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत, असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. भारताचा इंग्लंड दौरा १४ सप्टेंबरला संपत असून, त्यानंतर आयपीएलचा दुसरा टप्पा खेळवण्याबाबत चर्चा सुरू आहे.

१. संयुक्त अरब अमिराती
आयपीएलचा मागील हंगाम बीसीसीआयने संयुक्त अरब अमिरातीमध्ये यशस्वी करून दाखवला होता. भारतामधून ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा हलवण्याचा निर्णय घेतल्यास अमिराती हाच पर्याय उपलब्ध आहे.

२. इंग्लंड
भारतीय संघ मे अखेरीस जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यासाठी इंग्लंडला जाणार आहे. त्यानंतर इंग्लंडशी पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर तिथेच आयपीएलचा दुसरा टप्पा खेळवता येऊ शकतो. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांसाठी मिडलसेक्स, सरे, वॉर्विकशायर आणि लँकेशायर या चार इंग्लिश कौंटी संघांनी उत्सुकता दर्शवली आहे.

३. ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियातील सरकारने येत्या चार महिन्यांत आपले हवाई धोरण बदलल्यास हा पर्याय अधिक सुरक्षित असेल.