शाळा सुरु झाल्या, पण दहावी व बारावी बोर्ड परीक्षांचे काय? शिक्षणमंत्र्यांनी दिले उत्तर
बातमी महाराष्ट्र

शाळा सुरु झाल्या, पण दहावी व बारावी बोर्ड परीक्षांचे काय? शिक्षणमंत्र्यांनी दिले उत्तर

कोल्हापूर : राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल (15 जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली. मात्र दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा कधी होणार? अभ्यासक्रम किती असणार? असे असंख्य प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहेत. या सर्व प्रश्नांनाही दिलासा देत 10 वी आणि 12 च्या परीक्षेबाबत लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कोल्हापुरात दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याबाबत बोलताना मंत्री गायकवाड म्हणाल्या की, ” सध्या 15 ते 16 लाख विद्यार्थी या वर्गात आहेत. मात्र, कुणाला कोरोना लागण झाली नाही. विद्यार्थ्यांचे आरोग्य हीच आमची प्राथमिकता आहे. तसेच, 9 ते 12 वी वर्ग सुरू करताना जी काळजी घेतली तिच काळजी यावेळी देखील घेतली जाणार आहे. येत्या 10 दिवसात सगळी तयारी करण्यात येणार आहे. याचबरोबर 2025 पर्यंत शाळांची गुणवत्ता वाढवण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. त्यासाठी सर्व शासकीय शाळेत इंटरनेट पोहचवलं जाईल. माझं शिक्षण माझं भविष्य, ही शिक्षण क्षेत्रातील नवीन टॅगलाईन असल्याचेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

तसेच, ”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळांमध्ये इ.५ वी ते ८ वीचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात मंजुरी दिली आहे. येत्या २७ जानेवारीपासून कोरोनासंबंधित सगळी खबरदारी घेऊन हे वर्ग उघडले जातील. विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेत कुठलीही कसूर राहणार नाही, अशी खात्री पालकांना देते.” अशी ग्वाही मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. राज्यात जरी शाळा सुरु होणार असल्या तरी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणमध्ये जरी आला असला तरी अन्य देशांमधील कोरोनाची दुसरी लाट व अन्य राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता मुंबईतील शाळा या 16 जानेवारीपासून पुढील आयुक्तांचे आदेश मिळेपर्यत बंद राहतील, असं मुंबई महापालिका शिक्षण विभागाकडून परिपत्रक काढून सांगण्यात आलं आहे.