नाव बदलायचंच असेल तर महाराष्ट्राचं नामांतर करा; ‘या’ नेत्याची उद्धव ठाकरेंकडे मागणी
राजकारण

नाव बदलायचंच असेल तर महाराष्ट्राचं नामांतर करा; ‘या’ नेत्याची उद्धव ठाकरेंकडे मागणी

मुंबई : औरंगाबादला एक इतिहास आहे. तो इतिहास पुसून औरंगाबादचं नाव बदलणं योग्य नाही. नाव बदलायचंच असेल तर महाराष्ट्राचं नामांतर करा आणि छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र असे नाव द्या, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केली आहे. औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणुकांच्या तोंडावर औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेना कॉंग्रेस आमनेसामने आले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याबाबत प्रतिक्रिया देताना अबू आझमी म्हणाले की, शहरांची जिल्ह्यांची नावे बदलून काही फायदा नाही. नामांतर करून विकास होत नाही. नामांतर करायचं असेल तर नवे जिल्हे निर्माण करा. त्यांना नाव द्या. औरंगाबाद, अहमदनगर यांची नावे बदलून उपयोग नाही. संभाजी महाराजांचे नाव द्यायचे असेल तर ते रायगड जिल्ह्याला द्या, त्यापेक्षा महाराष्ट्राचे नामांतर करा आणि छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र असे नाव द्या, असा सल्ला अबू आझमी यांनी दिला आहे.

‘महाराष्ट्रात देशभरातून, जगभरातून लोक येत असतात. तुम्ही राज्याला पुढं घेऊन जा. विकास करा. नवे जिल्हे निर्माण करा. लोक नक्कीच तुमचं कौतुक करतील. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचं काम करू नका. ते आपल्यासारख्याला शोभत नाही,’ असं आझमी यांनी म्हटलं आहे.

तसेच, तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव बदलण्याचे राजकारण करू नये, असा सल्लाही दिला आहे. तर, ”अबू आझमी हे समजूतदार नेते आहेत. अबू आझमींचा संभाजीनगरला काही विरोध असेल असं वाटत नाही. त्यांनी राम मंदिरालाही विरोध केला नव्हता, अशी प्रतिक्रिया तर शिवसेना नेते संजय राऊत दिली आहे.

दरम्यान, औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा मुद्दा समोर आल्यापासून शिवसेनेची चौफेर कोंडी होत आहे. एकीकडे महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने नामांतराला विरोध केला आहे. तर विरोधी पक्ष असलेला भाजपा आणि मनसे नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर सातत्याने टीका करत आहेत.