उद्धव ठाकरे हेच सचिन वझे यांचे गॉडफादर; नारायण राणेंचे मुख्यमंत्र्यांवर खळबळजनक आरोप
राजकारण

उद्धव ठाकरे हेच सचिन वझे यांचे गॉडफादर; नारायण राणेंचे मुख्यमंत्र्यांवर खळबळजनक आरोप

मुंबई : सचिन वझे प्रकरणी महाविकास आघाडी सरकार समोरच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांची बदली केल्यानंतर सिंह यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र पाठवलं. या पत्रात थेट राज्याच्या गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. या पत्राने राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. अशातच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे भाजपा नेते नारायण राणे यांनी याहून खळबळजनक आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

”उद्धव ठाकरे हेच सचिन वझे यांचे गॉडफादर आहेत. त्यांनीच सचिन वाझे यांना खंडणी वसूल करण्याची परवानगी दिली. असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणे म्हणाले की, गेले काही महिने सचिन वाझे कधी वर्षावर तर कधी ओबेरॉय मध्ये राहत होते. सचिन वाझे यांना क्राईम ब्रँचमध्ये मुख्यमंत्र्यांनी आणले आणि कोणत्याही नवीन प्रकरणाचा तपास त्यांनाच द्यावा, असाही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. इतकेच नव्हे तर, सचिन वाझे यांना खंडणी वसूली करण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांनी दिली आणि त्यांना अटक होऊ नये यासाठी सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनीच प्रयत्न केला, असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.

नारायण राणे म्हणाले की, “राज्यात लोकांचे प्रश्न मागे राहिलेत, शेतकरी, कामगार आणि इतर प्रश्नही मागे राहिलेत. पैसे द्या आणि मुडदे पाडा असं या राज्यात सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी या राज्याला काळीमा फासलाय. मागच्या इतिहासात असा मुख्यमंत्री झाला नाही. सचिन वाझेंनी आतापर्यंत कुणासाठी एन्काऊंटर केलेत याची माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे राज्यामध्ये असा मुख्यमंत्री आणि असा गृहमंत्री असू नये असं मला स्पष्टपणे वाटतं.”

या प्रकरणी गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या अथवा नको पण पहिला मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे. तसेच, परमबीर सिंह यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी कोणतीही कारवाई का केली नाही, असा सवालही नारायण राणे उपस्थित केला. त मुख्यमंत्रीच सचिन वाझेचे गॉडफादर असून मनसुख हिरेन याच्या सारख्या निरपराधाला मारण्याचं पाप मुख्यमंत्र्यांनी केलं. असे अनेक धक्कादायक आरोप नारायण राणे यांनी केले आहेत.