चेन्नईने रोखला आरसीबीचा विजयरथ; बंगळुरुचा दारुण पराभव
क्रीडा

चेन्नईने रोखला आरसीबीचा विजयरथ; बंगळुरुचा दारुण पराभव

मुंबई : आयपीएल २०२१मध्ये सुरु असलेला आरसीबीचा विजयरथ रोखण्यात चेन्नई सुपर किंग्सला यश आले आहे. बंगळुरुचा चेन्नईने दारुण पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे. चेन्नईचा हा सलग चौथा विजय ठरला. कर्णधार महेंद्र सिंह धोनीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसीस यांनी चेन्नईच्या डावाची सुरूवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९.१ षटकात ७४ धावा केल्या. ऋतुराज २५ चेंडूत ३३ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या रैनाने फाफसह संघाचे शतक पूर्ण करून दिले. पण १११ धावांवर प्रथम रैना वैयक्तिक २४ धावांवर नंतर फाफ ५० धावांवर बाद झाला. त्यामुळे चेन्नईची अवस्था ३ बाद १११ अशी झाली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अंबाती रायडू देखील फार मोठी धावसंख्या करू शकला नाही. तो ७ चेंडूत १४ धावा करून बाद झाला. अखेरच्या षटकात जडेजाच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने २० षटाकत १९१ धावा केल्या. जडेजाने २८ चेंडूत नाबाद ६२ धावा केल्या. जडेजाने हर्षल पटेलच्या अखेरच्या षटकात पाच षटकार मारले आणि चेन्नईला सामन्यात मोठी धावसंख्या उभारुन दिली. आरसीबीकडून पटेलने टाकलेल्या शेवटच्या षटकात जडेजाने ३७ धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील हे सर्वात महाग षटक ठरले आहे.

विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या बंगळुरूला सुरूवात चांगली मिळाली. पण चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विराट कोहली (८ धावा) बाद झाला. त्याला सॅम करनने बाद केले. त्यानंतर शार्दुलने देवदत्तला बाद केले. देवदत्तने १५ चेंडूत ३४ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या वॉशिंग्टन सुंदरला जडेजाने बाद केले. त्यानंतर धोकादायक ग्लेन मॅक्सवेलही बाद झाला. तर एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॅनियल ख्रिस्टिनला जडेजाने धावबाद केले. शेवटची आशा असलेल्या एबी डिव्हिलियर्सला जडेजाने बोल्ड केले आणि बेंगळुरूचा पराभव निश्चित केला. बंगळुरूने २० षटकात ९ बाद १२२ धावा केल्या. सामन्यात जडेजाने नाबाद ६२ धावा केल्या. गोलंदाजीत ४ षटकात १३ धावा देत ३ विकेट तर क्षेत्ररक्षणात एकाला धावबाद केले.