राज्यसरकारचा मोठा निर्णय; खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ५० टक्केच उपस्थिती राहणार
कोरोना इम्पॅक्ट

राज्यसरकारचा मोठा निर्णय; खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ५० टक्केच उपस्थिती राहणार

मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा राज्यात शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच रुग्णसंख्येची आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली. त्यामुळे आरोग्य विभाग आणि राज्य सरकारची झोप उडाली असून, कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्य शासनाने परिपत्र काढून हे नवीन निर्बंध लागू केले आहेत. या नुसार, राज्य शासनाने कोविडचा वाढत प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ( आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) 50 टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे असेही या आदेशात म्हटले आहे.

तसेच, नाट्यगृहे व सभागृहे यामधील उपस्थिती देखील 50 टक्के असावी तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने 17 मार्च रोजी यासंदर्भात परीपत्रक काढलं आहे. त्यामध्ये, कोरोना नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

तोंडावर मास्क असल्याशिवाय कुठल्याही आस्थापनामध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच तापमान तपासण्यात येईल, तसेच प्रत्येक कार्यालयात सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आलं आहे. शासनाने काढलेला हा आदेश 31 मार्च पर्यंत अंमलात येणार असून त्यानंतर पुढील आदेश निर्गमित करण्यात येतील, असेही या आदेशात म्हटले आहे. राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या सहीने हा आदेश पारित करण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. गेल्या तीन- चार दिवसांपासून बाधितांचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढत असून एका दिवसात सर्वाधिक बाधितांची उच्चांकी नोंद गुरुवारी झाली. गुरुवारी चोवीस तासांत तब्बल २५ हजार ८३३ लोकांना करोनाची लागण झाली असून ५८ जणांचा मृत्यू झाला, तर १२ हजार १७४ जणांनी या आजारावर मात केली. सध्या राज्यात आठ लाख १३ हजार २११ व्यक्ती गृह अलगीकरणात असून ७०९७ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.७९ टक्क्यांवर गेले आहे.